माय मराठी- कविता - इयत्ता 5 वी मराठी बालभारती- पृष्ठ क्र -1,कविता व अर्थ
संजीवनी मराठे याची कविता - माय मराठी
माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
- संजीवनी मराठे
हे माय मराठी! मी तुझ्या पायाशी तन-मन-धन वाहिले असून तुझ्या नावात व तुझ्या वास्तव्यात मी अखंड रंगत आहे. मला मराठी भाषेविषयी अभिमान आहे
हे आई मला तुझ्याकरिता कष्ट करायला आवडते. तुझ्या सहवासात रहायला आवडते. आणि मला तुझी अंगाई देखील आवडते
तुझ्या प्रदेशातील पाखरे आणि येथील लोक मला हवेहवेसे वाटतात मराठी भाषेत व्यक्त केलेल्या राग, आनंद या भावना मला हव्याहव्याशा वाटतात
हे मराठी माय! मला तुझ्या मुलुखातच खेळायला बागडायला आवडते तसेच माझ्या मनातील कल्पना सहजतेन मराठीतच व्यक्त करायला आवडतात
तुझ्याबरोबर चालणे, मायमराठीत बोलणे, मराठी संस्कृती याबद्दल मला नितांत प्रेम आहे. जे मनात असेल ते बोलून दाखविणे ही तुझी शिकवण मला आणखी निर्भर करते
मायमराठीतील शब्द, त्यांचा अर्थ व त्यातील भावभावनांची सुंदरता यांची सुंदर मोहनमाळ गुंफण्यात मी मग्न झाले आहे
हे माय मराठी! मी नेहमी तुझ्यासाठी झटत राहील जगात तुझी पताका फडकविण्यासाठी सतत कार्यरत राहीन व मी मराठीचा सतत अभिमान बाळगेन
माय मराठी- कविते वरील video पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments