बलसागर भारत होवो- इयत्ता सहावी मराठी बालभारती- पृष्ठ क्र 1-समूहगीत व अर्थ

बलसागर भारत होवो- इयत्ता सहावी मराठी बालभारती- पृष्ठ क्र 1-समूहगीत व अर्थ 

बलसागर भारत होवो

 समूहगीत-

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले,

राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ।

बलसागर ।।१।।

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन ,

हा तिमिर घोर संहारिन, या बंधु सहाय्याला हो ।

बलसागर  ।।२।।

हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून,

ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो ।

बलसागर ।।३।।

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ,

विश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ।

बलसागर।।४।।

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ,

हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ।

बलसागर ।।५।।

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल,

जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ।

बलसागर ।।६।।

समूहगीताचा अर्थ- 

1 बलसागर ----- मरायला हो ॥१॥

अर्थ - आपला भारत देश हा शक्तिशाली व्हावा व सर्व जगात त्याची ख्याती पसरावी. यासाठी जनसेवेचे व्रत मी हाती घेतले आहे. भारतासाठी माझे प्राण दयायला देखील मी तयार आहे.

2 वैभवी-----सहाय्याला हो ॥२॥

अर्थ - माझ्या देशाला वैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करणार आहे. त्यासाठी भेदभाव, अराजकता अशांचा अंधार दूर करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्व बांधव मला सहाय्य करायला या. 3 हातात----- करायाला हो ॥३॥

अर्थ - भारताच्या वैभवासाठी आपण सगळे एकत्र येऊ. हातात हात घेऊन मनात ऐक्याचाएकजुटीचा मंत्र म्हणत आपण हे कार्य करायला सिद्ध होऊ या.

4 करि दिव्य-------निजपदा लाहो ॥४॥

अर्थ – हाती दिव्य पताका घेऊन आपण प्रिय भारताविषयीची गीते गाऊ या. आपल्या भारताचा पराक्रम संपूर्ण जगात दाखवू या.

5 या उठा -------राहो ॥५॥

अर्थ - चला यासाठी आपण आपल्या पराक्रमाची शर्थ करू या. त्यासाठी आपण शक्य ते सगळे प्रयत्न करू या. असे जर केले नाही तर आपले जीवन वाया जाईल. त्यामुळे भारताचे भाग्य असेच उजळून निघो.

6 ही माय ---------- येवो ॥६॥

अर्थ – या सर्वांमुळे भारताचे नाव मोठे होईल. त्याचे वैभव वाढेल. जगाला शांती देणारा भारत हा महान देश होईल व हा सोन्याचा दिवस लवकरात लवकर उदयाला येवो.

२-  बलसागर भारत होवो समूह्गीतावर आधारित video पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

3- बलसागर भारत होवो समूह्गीतावर आधारित MCQ स्वाध्याय सोडवण्यासाठी येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments